नेर येथील पुतळ्यांचे सौदर्यीकरण करणार
-पालकमंत्री संजय राठोड
            यवतमाळ, दि. 30 : नेर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दर्गा अशा तिनही स्थळांचा विकास करण्याची आवश्यकता आहे. यासाठी नगरपालिकेने पुढाकार घेऊन नेर येथील पुतळ्यांचे सौदर्यीकरण करावे, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले. आज विश्रामगृहात नगरपालिका क्षेत्रातील विविध विकास कामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
            पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, नेर शहरात सार्वजनिक उपयोगासाठी विविध ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र नागरीकांनी त्यांना सोयीच्या ठिकाणी महापुरूषांचे पुतळे उभारले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने अनधिकृत जागी असलेले पुतळे आणि बांधकाम हटवावे लागणार आहे. त्यामुळे नेर येथीलही पुतळ्याचा प्रश्न समोर आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अत्यंत कमी जागेत आहे. याच ठिकाणी या पुतळ्याचे सौदर्यीकरण करणे शक्य होणार नाही. त्यासाठी शिवाजीनगर येथील उद्यानात हा पुतळा हलविला जाऊ शकतो काय याबाबत स्थानिक नागरीकांशी चर्चा करावी. नागरीकांनी सहमती दर्शविल्यास याच उद्यानात गौतम बुद्ध आणि डॉ. आंबेडकर यांचा पुतळा अत्यंत आकर्षिकरित्या उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच महालक्ष्मी नगरातीलही उद्यानाचा पयार्य नगरपालिकेने ठेवावा. पुतळ्यांचा सौदर्यीकरणासाठी पालिकेकडे स्वत:च्या निधीचाच पर्याय आहे. त्यामुळे पालिकेने आपले उत्पन्न वाढविण्यासाठी विविध बाबींचा विचार करावा. यासाठी शासनातर्फे संपुर्ण सहाकार्य करण्यात येईल.
            शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दर्गा यांचा सौदर्यीकरणात मोठा वाटा आहे. त्यामुळे केवळ अस्थितेच्या मागे न जाता नागरीकांनी या पुतळ्यांच्या सौदर्यीकरणासाठी पुढाकार घ्यावा. वेळ पडल्यास या कामासाठी लोकवर्गणीही काढून पुतळ्याचा विकास करण्यात येईल. नगर पालिकेने 82 दुकानांचे प्रस्ताव ठेवला आहे. तो तातडीने मंजूर करून घ्यावा, यामुळे नगरपालिकेला एकरकमी मोठी रक्कम मिळण्यास मदत होणार आहे. शहरातील रस्ते, नाले, जलवाहिन्या यांचाही विकास आराखडा तयार करून शहराला सर्व सोयींनी युक्त असे शहर बनविण्यास पदाधिकारी आणि अधिकारी यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी