बळीराजातून १५ शेतकऱ्यांना कर्करोगासाठी मदत
*शेतकऱ्यांनी प्रस्‍ताव पाठविण्‍याचे आवाहन
यवतमाळ, दि.२८ : बळीराजा चेतना अभियानांतर्गत जिल्ह्यातील कर्करोगग्रस्‍त (कॅन्‍सर) शेतकऱ्यांना उपचारासाठी हातभार लागावा, यासाठी ‘कर्करोगपिडीतांना बळीराजा चेतना अभियानाची मदत’ ही योजना अंमलात आणलेली आहे. यातून जिल्‍ह्यातील १५ कर्करोगग्रस्‍त शेतकऱ्यांना प्रत्‍येकी १० हजारांची मदत देण्‍यात आली आहे. या मदतीमुळे शेतकऱ्यांच्‍या खांद्यावरील आर्थिक भार कमी झाल्‍याने दिलासा मिळत आहे. या योजनेचा लाभ पिडीत शेतकरी कुटुंबियांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
शेतीवरच उपजिविका असणाऱ्या शेतकरी कुटुंबातील एखादा सदस्य कर्करोगाने पिडीत असल्यास अशा व्‍यक्तींच्या उपचारासाठी १० हजार रूपये बळीराजा चेतना अभियान समितीच्‍या खात्‍यामध्‍ये जमा झालेल्‍या लोकवर्गणीतून देण्यात येत आहे.
शेतकरी कुटुंबांसाठी कर्करोगाची समस्या ही गंभीर स्वरूपाची असून त्याच्या उपचारासाठी कुटुंबांना पैशाची तजवीज करावी लागते. उपचारासोबत तपासणी, औषध, तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे तपासणीकरिता जाण्यासाठी वाहतूक खर्च, रूग्णालयात उपचार सुरू असताना इतर व्‍यक्‍तींचा खर्च, तातडीने लागणारे औषधोपचार यावर बऱ्याच प्रमाणात खर्च होतो. अशा अनेक कारणामुळे शेतकरी कुटुंबांना इतरत्र योग्य उपचार घेता येत नव्‍हते. मात्र, आता यासाठी ही मदत देण्‍यात येत आहे.
आतपर्यत उमरखेड तालुक्‍यातील प्रतिभा केशव घोंगडे, दिगांबर सुर्यवंशी, शकुंतला दत्‍तराव यादवकुळे या तिघांना मदत देण्‍यात आली. महागाव तालुक्‍यातील माया ज्ञानेश्‍वर चव्‍हाण, नेर तालुक्‍यातील वच्‍छला शामराव चव्‍हाण, बेबी रोहिदास चव्‍हाण, गंगाबाई रामभाऊ राऊत, रमेश माधवराव गोल्‍हर यांना मदतीचा धनादेश देण्‍यात आला. आर्णी तालुक्‍यातील माधव जाधव, मनोहर देविदास बेंडे, प्रमिला विश्‍वनाथ राठोड, सुंदराबाई नरसिंग आडे, दु्र्गा धनराज जाधव यांना मदतीचे धनादेश तहसील कार्यलयामार्फत तर झरीजामणी तालुक्‍यातील श्‍वेता परमेश्‍वर दर्शनवार यांना १० हजारांचा धनादेश तहसील कार्यालयातून वितरीत करण्‍यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी