शाळांच्या तक्रारीसाठी स्वतंत्र लोकशाही दिन
*तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक
* निनावी तक्रार करता येणार
यवतमाळ, दि. 11 : यवतमाळ येथील जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीतर्फे संचालित यवतमाळ पब्लिक स्कुलमध्ये बाल लैंगिक अत्याचाराची घटना घडलेली आहे. याप्रकरणी दोषींवर गुन्हे नोंदविण्यात आले आहे. समाजमन ढवळून काढणारी आणि चिंता निर्माण करणारी ही घटना आहे. अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नये, यासाठी शाळांबाबत पालकांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी जिल्हास्तरावर लोकशाही दिन आयोजित करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. यात नागरीकांना लिखित किंवा टोल फ्री क्रमांकावर नाव गुप्त ठेऊनही तक्रार करता येणार आहे.
यवतमाळ पब्लिक स्कुलमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत 3 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सामाजिक कार्यकर्ते, पालक आदींबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये विविध सूचना करण्यात आल्या होत्या. पालकांमध्ये पाल्यांना शाळेतून काढून टाकल्यास त्याच्या प्रवेशाची चिंता असते. त्यामुळे पालक शाळा व्यवस्थापनाविरोधात तक्रार करण्यास धजावत नाहीत. तसेच शाळा प्रशासनाने नेमक्या काय सुधारणा कराव्यात याबाबत कोणीही आवाज उठवत नाही. ही वस्तुस्थिती विचारात घेऊन जिल्हाधिकारी यांनी शाळांच्या कारभाराबाबत तसेच पालकांच्या तक्रारींच्या अनुषंगाने जिल्हास्तरावर लोकशाही दिन आयोजित करण्याचे निश्चित केले आहे.
पालकांनी त्यांचे पाल्य ज्या शाळेत शिकत असतील त्याबाबतच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयात लिखित स्वरूपात कराव्यात. तसेच सूचना निनावी करावयाची असल्यास जिल्हाधिकारी कार्यायातील 1077 या क्रमांकावर दूरध्वनीवरून करू शकतील. यापुढे शाळेतील शिक्षक, शाळेतील व्यवस्थापक यांच्याकडून विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत असल्यास त्याची तक्रार या टोल फ्री क्रमांकावर कार्यालयीन वेळेत नोंदविता येईल. यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. यात पालकांनी मुक्तपणे तक्रारी कराव्यात, त्यांची नावे गोपनिय ठेवण्यात येतील, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी