कुष्ठरुग्णांना सामाजिक योजनांचा लाभ द्या
- सचिंद्र प्रताप सिंह
* कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमाचा आढावा
* कुष्ठरुग्ण व त्यांच्या पालकांना प्रशिक्षण
यवतमाळ, दि. 26 : कुष्ठरोग निर्मुलनासाठी राष्ट्रीय कुष्ठरोग कार्यक्रमाची योग्य अंमलबजावणी करण्यासोबतच या आजाराने ग्रस्त असलेल्या नागरिकांना विविध सामाजिक योजनांचा लाभ द्या, असे निर्देश जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले.
कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महसूल भवन येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी दिपककुमार सिंगला, जिल्हा शल्य चिकित्सक टी.जी.धोटे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अर्चना इंगोले, कुष्ठरोगचे सहाय्यक संचालक डी.डी.भगत आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील कुष्ठरुग्णांची माहिती जाणून घेतली. ज्या व्यक्ती या आजाराने ग्रस्त आहे अशा व्यक्तींना नियमित औषधोपचार करण्याच्या सुचना त्यांनी केल्या. नियमित औषधोपचाराने हा आजार नाहीशा होतो. त्यामुळे औषधोपचारात खंड पडू नये व नियमित हा कार्यक्रम सुरु रहावा, असे त्यांनी सांगितले. या आजाराचे नवीन रुग्ण होवू नये यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याच्या सुचनाही  त्यांनी केल्या.
जिल्ह्यात कुष्ठरोगाचे 952 इतके सक्रीय रुग्ण आहे. या रुग्णांच्या घरभेटी करून त्यांच्यावर नियमित उपचार करण्यासोबतच विविध सामाजिक योजनांचा लाभ त्यांना दिला जावा. या रुग्णांना संजय गांधी निराधार योजना, इंदिरा आवास योजना, अंत्योदय योजना, बिपीएल कार्डचा लाभ देण्यासोबतच रुग्ण व रुग्णाच्या मुलांना व्यावसायीक प्रशिक्षण देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
नाशिक येथे व्यावसायीक प्रशिक्षण देण्याची सुविधा आहे. प्रशिक्षणासाठी सुरुवातीस 5 हजार रूपये भरावे लागत असल्याने यास फारसा प्रतिसाद मिळत नाही. ही बाब निदर्शनास आल्यानंतर आजरग्रस्त व्यक्ती शेतकरी असल्यास बळीराजा चेतना अभियानातून ही रक्कम भरली जातील, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. तालुकानिहाय रुग्णांच्या याद्या करून त्यांना जास्तीत जास्त सामाजिक व अन्य येाजनांचा लाभ दिला जावा. या आजारावर आता सहज उपचार उपलब्ध असून आजारातून मुक्त होता येते. याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत दिले.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी