बळीराजाच्या दुसऱ्या टप्प्यात सामाजिक, कृषि समुदेशन
- किशोर तिवारी
*मदतीचे वाटप जाहिर कार्यक्रमात करावे
*चांगल्या कामाचा सत्कार करणार
*नाविण्यपूर्ण योजना सुचवाव्यात
यवतमाळ, दि. 27 : बळीराजा चेतना अभियाना जिल्ह्यात सुरू होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. सर्व यंत्रणांच्या मदतीने शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यात यश मिळाले आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्यांमध्ये कमालीची घट झाली आहे. त्यामुळे येत्या काळात या अभियानातून दुसऱ्या टप्प्यात शेतकऱ्यांसाठी सामाजिक आणि कृषि समुपदेशनाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यात समाजातील सर्व घटकांना सहभागी करून घेण्यात येणार असल्याची माहिती कै. वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील गार्डन हॉल येथे आज बळीराजा चेतना अभियानांतर्गत करावयाच्या मदतीबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप‍ सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक सिंगला, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गायनार, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गायकवाड आदी उपस्थित होते.
श्री. तिवारी म्हणाले, जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांमध्ये घट होत आहे, ही ज्याप्रमाणे भूषणावह बाब आहे, त्याचप्रमाणे हा कल कायम राखणेही एक आव्हानच आहे. यासाठी शेतकऱ्यांना सर्वप्रकारे मदत करण्यात येणार आहे. त्यासाठी सामाजिक आणि कृषि समुदपदेश हा बळीराजा अभियानाचा पुढील टप्पा असणार आहे. यात प्रमुख्याने शेतकऱ्यांच्या जमिनीचा पोत लक्षात घेऊन त्याला चांगले उत्पन्न मिळवून देणारे पिक घेण्यासाठी मार्गदर्शन आणि मदत करण्यात येणार आहे. अभियानाच्या माध्यमातून विविध उपक्रमांमधून शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काळात गावपातळीवरील सर्व कर्मचाऱ्यांनी कर्तव्यदक्ष राहिल्यास चांगले परिणाम दिसून येतील. तसेच येत्या काळात उपजिविकेच्या साधनात वाढ करण्यात येणार असून शेतकरी केवळ शेतीवर अवलंबून राहणार नाही, अशी स्थिती निर्माण करण्यात येईल.
बळीराजा अभियानातून शेतकऱ्यांना थेट मदत व्हावी, यासाठी एक लाख रूपये प्रत्येक गावाला देण्यात आले आहे. यातून हातउसणी, पेरणीसाठी मदत, वाचनालय, सर्व्हेक्षण, आरोग्य सुविधा आदीसाठी ग्रामसेवकांनी लाभार्थी निवडून त्यांना कमाल पाच हजार रूपयांपर्यंत मदत द्यावयाची आहे. मात्र अनेक ग्रामसेवकांनी ही मदत वाटप केलेली नाही. मात्र हातउसणवारी आणि पेरणीसाठी प्राधान्याने मदत करावयाचे निर्देश देण्यात आले, तसेच आवश्यकता भासल्यास वाचनायल, सर्वेक्षणाचे पैसे हातउसणवारी आणि पेरणीसाठी मदत म्हणून देण्यात यावे. शेतकऱ्यांना ही मदत करताना अत्यंत गरजू व्यक्तीस देण्यासाठी लाभार्थींची निवड ग्रामसभेत करावी, यासाठी ग्रामसमितीला विश्वासात घेऊन पारदर्शक पद्धतीने मदत वाटप करावी. हे काम चांगल्या पद्धतीने करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कारही करण्यात येणार असल्याचे श्री. तिवारी यांनी सांगितले.
बळीराजा अभियानात चौकटीत राहतील, असे उपक्रम राबविण्यात येत नाही. समाजात ज्याप्रमाणे आवश्यकता असेल, त्याप्रमाणे योजना आणि अटी ठरवून नवनवीन योजना आखण्यात येत आहे. त्यामुळे गावपातळीवर कार्य करीत असताना येणाऱ्या अडचणी आणि अभियानात राबविण्याच्या उपक्रम गटविकास अधिकारी आणि तहसिलदारांनी सूचवाव्यात, असे आवाहनही श्री. तिवारी यांनी यावेळी केले.
मदतीची यादी 15 ऑगस्ट रोजी ग्रामसभेत लावावी
            जिल्ह्यातील गावांमध्ये 15 ऑगस्ट रोजी सर्वत्र ग्रामसभा घेण्यात येणार आहे. या ग्रामसभेत बळीराजा चेतना अभियानातून देण्यात आलेली मदत आणि लाभार्थ्यांची यादी ग्रामसभेत वाचून दाखवावी, तसेच नागरीकांच्या माहितीसाठी ग्रामपंचायतीमध्ये लावण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप‍ सिंह यांनी दिले.
00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी