आश्रमशाळा विद्यार्थी मृत्यूप्रकरणी संबंधीतांवर कार्यवाही करा
- किशोर तिवारी
* शेतकरी मिशन मुख्यमंत्र्यांना अहवाल देणार
* मिशन अध्यक्षांची आश्रमशाळेला भेट
* विद्यार्थ्याच्या कुटुंबास शासनाकडून मदत
यवतमाळ, दि. 19 : कळंब तालुक्यातील अंतरगाव येथील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा सर्पदंशाने मृत्यु झाला असून सदर विद्यार्थ्याच्या मृत्युस जबाबदार असणाऱ्या सर्व संबंधीतांवर जबाबदारी निश्चित करून कार्यवाही करण्याचे निर्देश शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिले.
या दुर्देवी घटनेची गंभीरतेने नोंद घेत मिशनच्या अध्यक्षांनी सदर विद्यार्थ्याच्या कुटुंबियांची रुंझा येथे घरी जावून भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर मेटीखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देवून विद्यार्थ्यावरील उपचारात दिरंगाई झाली होती काय याची कसून  चौकशी केली. त्यानंतर सर्पदंश झालेल्या अंतरगाव येथील आश्रमशाळेस भेट देवून तेथील व्यवस्थेची पाहणी केली. त्यानंतर पांढरकवडा येथे आरोग्य, आदिवासी, बांधकाम, महसूल, विद्युत, पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेवून या गंभीर घटनेस कारणीभुत असलेल्या सर्व संबंधीतांवर जबाबदारी निश्चित करून कार्यवाहीचे निर्देश दिले.
अंतरगाव येथील आश्रमशाळेच्या वर्ग सहावीतील आदित्य रवि टेकाम या विद्यार्थ्यास सर्पदंश झाल्यानंतर मेटीखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यास दाखल करण्यात आले होते. मात्र या ठिकाणी दोनपैकी एकही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते. या ठिकाणी डॉक्टर्स उपस्थित असते तर विद्यार्थ्यावर प्राथमिक उपचार होवू शकला असता. यवतमाळ येथे विद्यार्थ्यास हलविल्यानंतर दरम्यानच्या काळात त्याची प्रकृती खालावली. प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिल्यानंतर ही बाब निदर्शनास आली. सदर प्रकरण गंभीर असून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीबाबत श्री.तिवारी यांनी प्रचंड नाराजी व्यक्त करत आरोग्य विभागावर ताशेरे ओढले.
त्यानंतर अंतरगाव येथील आश्रम शाळेसही त्यांनी भेट दिली. शाळेच्या परिसराची त्यांनी पाहणी केली. अशा घटना भविष्यात पुन्हा घडू नये म्हणून परिसरात सुरक्षेच्या ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनास दिले. सुरक्षादृष्टीने आश्रमशाळांमध्ये सुविधा असणे आवश्यक आहे. सर्पदंशची घटना घडण्यास  आश्रमशाळेचे प्रशासन जबाबदार आहे का याची चौकशी करण्याचे सुचनाही त्यांनी केल्या. त्यानंतर पांढरकवडा येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांनी बैठक घेवून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले. भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून आवश्यक उपाययोजना तातडीने करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या. याप्रकरणाचा सविस्तर अहवाल मिशनच्या वतीने मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात येणार असल्याचे श्री. तिवारी यांनी यावेळी सांगितले.
बैठकीला प्रकल्प अधिकारी दिपककुमार मिना, बांधकामचे अधीक्षक अभियंता शशीकांत सोनटक्के, कार्यकारी अभियंता श्री.लाखाणी, उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, आरोग्य उपसंचालक कार्यालय अकोला येथील सहाय्यक संचालक, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, तहसिलदार, तालुका आरोग्य अधिकारी आदी उपस्थित होते. तत्पुर्वी रुंझा येथील विद्यार्थ्याच्या घरी भेट देवून शासनाच्यावतीने 80 हजार तर दिलासा संस्थेच्यावतीने 20 हजार रूपयाचा मदतीचा धनादेश देण्यात आला.

000000000


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी