टाकळी-डोल्हारी प्रकल्पाच्या भूसंपादनाचे नियोजन करावे
-पालकमंत्री संजय राठोड
            यवतमाळ, दि. 30 : नेर तालुक्यातील टाकळी-डोल्हारी येथील मध्यम प्रकल्प परिसराच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. हा प्रकल्प सुरवातीच्या काळात आहे, त्यामुळे या प्रकल्पाच्या भूसंपादन आणि पुनर्वसनाबाबत पाटबंधारे विभागाने तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले. आज विश्रामगृह येथे टाकळी-डोल्हारी प्रकल्पाबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी कार्यकारी अभियंता राजेश काटपेल्लीवार आदी उपस्थित होते.
            पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, नवे प्रकल्प हाती घेण्यापूर्वी जे जुने प्रकल्प 80 टक्के पूर्ण झालेले आहे, ते पूर्ण करण्यावर राज्य शासनाचा भर आहे. त्यासाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून देऊन ते पूर्ण करण्यात येत आहे. तसेच त्यावरील सिंचन क्षेत्र वाढविण्यात येणार आहे. मध्यम प्रकल्पाची उपयोगिता आणि जे प्रकल्प केवळ सुरवातीच्या टप्प्यात आहेत, अशा प्रकल्पांना शासनाकडून निधी मिळणे कठिण आहे. टाकळी-डोल्हारी हा प्रकल्पाचे अद्यापही भूसंपादन किंवा पुनर्वसन झालेले नाही. त्यामुळे या प्रकल्पासमोरील अडचणी मोठ्या आहेत. प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात तीन गावे येत असल्यामुळे पुनर्वसनाबाबतही या गावांचे एकमत केल्याशिवाय भूसंपादन होणे शक्य नाही. या गावातील नागरीकांच्या मताप्रमाणे त्यांना लगतच्या गावात स्थानांतरीत व्हावयाचे असल्यास तो पर्याय सर्वात आधी देण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना सर्व सोयी पुरविण्यात येणार आहे. प्रकल्पाचे काम करण्यापूर्वी पुनर्वसिताना नव्या जागी 23 नागरी सुविधा देणे कायद्याने बंधनकारक आहे. त्याशिवाय प्रकल्पाचे काम सुरू होणार नाही.
            पुनर्वसन करताना नागरीकांना त्यांच्या शेतीवर जाणे सोयीस्कर होईल, अशी जागा निवडावी. त्यामुळे शेतकरी भूसंपादनास सहकार्य करतील. हा प्रकल्प विहित वेळेत पूर्ण करता यावा, यासाठी पाटबंधारे विभागाने विशेष लक्ष देऊन भूसंपादन आणि पुर्वसनाची कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी