‘बळीराजा’चा निधी खर्चास गटविकास अधिकारी जबाबदार
-किशोर तिवारी
*निधी शिलक्क राहिल्यास ग्रामसेवक निलंबित
* आत्महत्या झाल्या ग्राम समितीवर कारवाई
*गरजू लाभार्थ्यांना मदतीचे वाटप व्हावे
यवतमाळ, दि. 15 : गेल्या तीन वर्षांपसून जिल्ह्यातील नापिकीने ग्रासलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी जिल्ह्यात बळीराजा चेतना अभियान राबविण्यात येत आहे. मात्र प्रत्येक ग्रामपंचायतीला हातउसणे आणि पेरणीसाठी मदत देण्यासाठी एक लाख रूपये उपलब्ध करूनही त्याचे पूर्ण वाटप झालेले नाही, अशा ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असून यात संबंधित गटविकास अधिकाऱ्यालाही जबाबदार धरण्यात येईल, असा सक्त इशारा कै. वसंतराव नाईक स्वालंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिला. गुरूवारी, दि. 14 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बळीराजा चेतना अभियानांतर्गत वाटप करण्यात येणाऱ्या मदतनिधीबाबत बैठक आयोजित करण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी दिपककुमार सिंगला, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गायकवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गायनार आदी उपस्थित होते.
श्री. तिवारी म्हणाले, सततच्या नापिकीमुळे जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. त्यांना थेट आणि रोख रक्कमेची मदत करणारी कोणतीही शासनाची योजना नाही, असे असताना आपण बळीराजा अभियानातून हात उसणी, पेरणी आणि उपचारासाठी मदत ग्राम समितीमार्फत देण्यात येत आहे. यासाठी गावातील खरोखरच मदत आवश्यक असणाऱ्यांना मदत मिळणे अपेक्षित होते, मात्र यात गावातील राजकीय मंडळी हस्तक्षेप करीत असल्यामुळे सधन आणि आवश्यकता नसणाऱ्या शेतकऱ्यांना मदत देण्याच्या जिल्हाभरात 21 गावातून तक्रारी आल्या आहेत. हा प्रकार अत्यंत निंदनीय असून आलेल्या सर्व तक्रारींची व्यक्तीश: तपासणी करण्यात येणार आहे. यात दोषी आढल्यास ग्रामसेवकाला निलंबित करण्यात करण्यात येणार असून संबंधित गटविकास अधिकाऱ्याला जबाबदार धरण्यात येणार आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी लाभार्थींची निवड जाहिररीत्या करण्यात यावी. सार्वजनिक कार्यक्रमात मदत वाटप करून त्यांची यादी ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यात यावी, असे त्यांनी यावेळी सांगितले.
…तर ग्रामसेवकांवर फौजदारी, गटविकास अधिकारी जबाबदार
शासन शेतकऱ्यांसाठी चांगले काम करीत असल्याचा विश्वास त्यांच्यात निर्माण झाल्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत जिल्ह्यातील आत्महत्यांच्या प्रमाणात 50 टक्क्यांनी कमी आली आहे. हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी ग्रामस्तरावर कार्य करणाऱ्या सर्व यंत्रणांनी सामुदायिकरित्या प्रभावी कार्य केल्यास हा आकडा लक्षणीयरित्या कमी होऊ शकतो. येत्या काळात शेतीच्या कामासाठी पैसा लागणार आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसात हातउसणवारी आणि पेरणीसाठी मदतीचे पैसे पूर्णपणे वाटप करावे, असे निर्देश देऊन श्री. तिवारी म्हणाले, आर्थिक अडचणीमुळे पेरणी करू शकले नाहीत आणि त्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्यास ग्रामसेवकांवर फौजदारी गुन्हा दाखल करून गटविकास अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याच्या सुचना त्यांनी यावेळी दिल्या. पैसा खर्च झालेला नसल्यास गटविकास अधिकारी यांना जबाबदार धरावे, पैसा खर्च करण्याप्रकरणी त्यांची खातेनिहाय चौकशी करावी, असे निर्देश श्री. तिवारी यांनी यावेळी दिले.
जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी, अभियानाच्या निधीमधून किमान 40 हजार निकडीच्या शेतकऱ्यांना मदत होण्याच्या उद्देशाने हातउसनवारीसाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला एक लाख रूपये देण्यात आले आहे. किमान तीन हजार आणि कमाल पाच हजार रूपये यातून प्रत्येक कुटुंबाला मदत करणे अपेक्षित होते. वाचनालय आणि आरोग्यबाबत खर्च करावयाचा निधी हातउसनवारी आणि पेरणीकरीता देण्याचे लेखी देऊनही याबाबत कार्यवाही करण्यात आलेली नाही. गटविकास अधिकारी यांनी हा निधी जाहिर कार्यक्रम घेऊन वाटप करावे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हे पाऊल उचलण्यात आले असून अत्यंत अडचणीतील एकही नागरीक यातून सुटता कामा नये. निधी वाटपाची प्रक्रिया योग्य पद्धतीने झाली नसल्यास कडक कारवाई करण्यात येईल. मदत वाटपाची टक्केवारी अत्यंत कमी असून येत्या आठ दिवसात पूर्णपणे मदतीचे वाटप करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.
जिल्ह्यात भूमीहिनांची संख्या मोठी असल्यामुळे रोजगार हमी योजनेंतर्गत कामे घेण्यासाठी गटविकास अधिकारी यांनी आतापासूनच नियोजन करावे. यातून मोठा रोजगार उपलब्ध होण्यास मदत मिळणार आहे. तसेच पुढील वर्षी वृक्षारोपणासाठी एक वर्षांची झाडे उपलब्ध होण्यासाठी नर्सरीचे आत्तापासूनच नियोजन करावे, यात शासनाकडून संपूर्ण मदत देण्यात येईल. नर्सरीची कामे रोजगार हमी योजनेतून करण्याचे नियोजन असून यात महिलांना वर्षभर काम पुरवण्याचे नियोजन करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी