सोयाबिनवरील किडीच्या व्यवस्थापनाविषयी सल्ला
यवतमाळ, दि. 26 :  सद्यापरिस्थितीत सोयाबिन पिक किमान सर्वसाधारणपणे 15 ते 20 दिवसाचे झाले आहे. सोयाबिन पिकावर काही ठिकाणी मोझॅक रोगाला तुरळक प्रमाणात सुरुवात झाली आहे. तसेच उंट अळी, तंबाखुची पाने खाणाऱ्या अळींचा तसेच केसाळ अळीचा प्रादुर्भाव सुरु झाल्याच्या तक्रारी येत आहे. या सोयाबिन पिकावर यावेळेस खोडमाशी आणि चक्रभुंगा किडीचाही प्रादुर्भाव येत असतो. या किडीचा व्यवस्थापनाच्यादृष्टीने शेतकऱ्यांनी वेळीच किड किंवा किडीच्या प्रार्दुभावाची आर्थिक नुकसान संकेत पातळी आढळून आल्यास केबल क्लेम शिफारशीत किटकनाशकाची फवारणी करावी, असे कृषी विज्ञान केंद्राने कळविले आहे.
मोझॅक या रोगामध्ये झाडांची वाढ खुटलेली दिसते. पाने आखूड लहान, जाडसर, व सुरकुतलेली होतात. अशा झाडांना शेंगा कमी लागतात व त्याही खुरटलेल्या सापडतात. या रोगाचा प्रसार मावा किडीद्वारे व बियाण्यांपासून होतो. पिवळा मोझॅक या रोगामध्ये झाडांच्या पानांचा काही भाग हिरवट तर काही भाग पिवळसर दिसून येतो. शेंड्याकडील पाने पिवळी पडून आकाराने लहान होतात. या रोगाचा प्रसार पांढऱ्या माशीमुळे होतो.
मोझॅक किंवा पिवळा मोझॅक रोगाचा प्रसार (प्रामुख्याने मावा व पांढऱ्या माशीमुळे होतो.) नियंत्रणासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून (लेबल क्लेम शिफारशीत उपाय नसल्यामुळे) पिवळ्या चिकट सापळ्याचा वापर (33X22 सेंमी आकाराचे पीसीआय कंपनीचे रेडीमेड सापळे) किमान 20 प्रति एकरी किंवा फोमशीट (30X15 सेंमी आकाराचे) पासून स्वत: घरी बनविलेले किमान 20 प्रति एकरी किंवा फोमशीट (30X15 सेंमी आकाराचे) टिन पत्र्यापासून बनविलेले किमान 32 पिवळे चिकट सापळे प्रति एकरी किंवा 30X15 सेमी आकाराचे टिन पत्र्यापासून बनविलेले 32 सापळे प्रति एकरी प्रमाणे 8 ते 10 दिवसाचे अंतराने त्यावर नियमितपणे एरंडी तेल किंवा पांढरे ग्रीस किंवा एकदा वापरलेले मोटर ऑईलचा चिकट पदार्थ म्हणून वापर करून पेरणीनंतर 10 ते 15 दिवसांनी शेतात उभारावे तसेच त्यासोबत 5 ते 10 टक्के प्रादुर्भावानुसार निंबोळी अर्काची 7 ते 10 दिवसाचे अंतराने दोनदा फवारणी करावी.
शेतात सापळे बसविताना ईशान्य (उत्तर-पूर्व) व नैऋत्य (दक्षिण-पश्चिम) दिशेनेच तिरपे पिकांच्या समकक्ष उंचीवर लावावे व पिक दीड फुटाचे वर उंचीचे झाल्यावर सापळ्याची उंची पिकाच्या उंचीचे 10 ते 15 सेमी खाली ठेवावी व स्वत: घरी सापळे बनवितांना ब्राईट येलो किंवा ब्रिजीयंट येलो किंवा गोल्डन येलो रंगाच्या ऑईल पेंन्टचा आवर्जून वापर करावा म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात मावा, पांढरी माशी, तुडतुडे व खोडमाशीच्या प्रौढावस्था याकडे आकर्षित होवून मरतात. यामध्ये नर व मादी दोन्ही प्रौढावस्था आकर्षित होतात, सापळ्याला चिकटतात व लगेच त्यांचा मृत्यू होतो. सापळे शेतामध्ये उभारण्याकरीता बांबुच्या 2.5 ते 3 फुट उंचीच्या खुंट्या घेवून साधारणपणे 8 ते 9 इंचापर्यंत जमिनीत रोवाव्यात. त्यावर प्लास्ट‍िक सुतळीच्या सहाय्याने पिवळे चिकट सापळे बांधावे. रेडीमेड पीसीआयचे पिवळे चिकट असल्यास ते दर महिन्यात बदलावेत.
उंट अळीचा प्रादुर्भाव असल्यास 3 ते 4 अळ्या प्रति मिटर ओळ अशी नुकसानीची संकेत पातळी (आ.नु.स.पा.) आढळल्यास डायक्लोरव्हॉस 76 टक्के प्रवाही 6 मिली. किंवा इंन्डोकझाकार्ब 15.8 इसी 7 मिली. किंवा प्रोफेनोफॉस 50 ईसी. 20 मिली किंवा क्लोरॅनट्रॅनिलीपोल 18.5 एससी 3 मिली  प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
खोडमाशी किंवा चक्रभुंग्यांचा प्रादुर्भाव असल्यास 3 ते 5 भुंगे प्रति मिटर ओळीत किंवा 10 टक्के प्रादुर्भाव अशी (आ.नु.स.पा.) आढळताच इथिऑन 50 ईसी, 30 मिली किंवा ट्रायझोफॉस 40 ईसी 12.5 मिली किंवा क्लोरॅनट्रॅनिलीपोल 18.5 एससी 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
तंबाखूची पाने खाणाऱ्या अळीचे नियंत्रणासाठी 4 ते 5 लहान अळ्या प्रति ओळ अशी (आ.नु.स.पा.) आढळल्यास इन्डोकझाकार्ब 15.8 ईसी, 7 मिली किंवा बॅसिलस थुरिंजिएंसिस पावडर (बीटी) 15 ग्रॅम किंवा डायक्लोरव्हॉस 76 ईसी, 6 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
काही ठिकाणी सोयाबीन क्षेत्रावर केसाळ अळीचा प्रादुर्भाव सुरु झाला आहे. ही पूर्ण वाढलेली अळी 40 ते 45 मिमी लांब असून तिची दोन्ही टोक काळी तर मधला भाग मळकट पिवळा असतो. तिच्या शरीरावर दाट नारिंगी केस असतात. अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या अधाशीपणे व सामुहिकपणे पानाच्या खालच्या बाजूवर राहून त्यातील हरितद्रव्य खातात. त्यामुळे अशी पाने जाळीदार होतात. अळ्या मोठ्या झाल्यावर शेतभर पसरतात आणि पाने खाऊन नुकसान करतात. तीव्र प्रादुर्भावात त्या झाडाचे खोडच शिल्लक ठेवतात. नियंत्रणाचे दृष्टीने डायक्लोरव्हॉस 76 ईसी, 6 मिली किंवा बॅसिलस थुरिंजिंएसिस (बी.टी.) 15 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
हे सर्व प्रमाण साध्या पंपाचे आहे. पावर स्प्रेयरनी फवारणी करावयाची असल्यास औषधाची मात्रा तिप्पट करावी. यावेळेस पिकाचे वाढीनुसार सोयाबिन पिकावर साधारणपणे 120 ते 150 लिटर पाणी एका एकराला लागते, म्हणजेच साध्या पंपानी 8 ते 10 स्प्रेपंप लागू शकतात.
अशाप्रकारे त्वरीत वेळीच काटेकोरपणे उपाय योजना केल्यास वरील सर्व किडी आणि रोगाचे चांगले नियंत्रण होते. तरी वेळीच शेतकऱ्यांनी जागृत होऊन पिक संरक्षणाचे उपाय अंमलात आणावेत, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. अनिल ठाकरे आणि विभागीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. सी. यु. पाटील यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी