रोहयोमध्ये 11 कलमी कार्यक्रमाचा समावेश
            यवतमाळ, दि. 12 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक लाभाच्या कामांना प्राधान्य देण्यासाठी राज्यात 11 कलमी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत ग्रामसभा आयोजित करून त्यामध्ये 11 कलमी कार्यक्रमातील कामांच्या पूरक आराखड्यास ग्रामसभेची मंजुरी घेण्यात येणार आहे.
            अकरा कलमी कार्यक्रमात सिंचन विहिरी, शेततळे, वर्मी कंपोस्टिंग, नाडेप कंपोस्टिंग, फळबाग लागवड, शौचालय, शोषखड्डे, गाव तलाव, पारंपारिक पाणी साठ्याचे नुतनीकरण व गाळ काढणे, जलसंधारणाची कामे, रोपांची निर्मिती, वृक्ष लागवड-संगोपन आणि संरक्षण, क्रीडांगणे, अंगणवाडी, स्मशानभूमी, सुशोभिकरण, ग्रामपंचायत भवन, गावांतर्गत रस्ते, घरकुल, गुरांचा गोठा, कुक्कुटपालन शेड, शेळीपालन शेड आणि मत्स्य व्यवसाय ओटे इत्यादी कामांचा समावेश आहे.
पुरक आराखड्यासह सन 2017-18 या वर्षीच्या नरेगा कामांच्या मुळ आराखड्यातही या कामांचा समावेश करण्यात येणार आहे. घाटंजी, राळेगाव आणि कळंब तालुक्याच्या नियोजनाकरीता स्वयंसेवी संस्थाची मदत घेण्यात येणार आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणाऱ्या लाभार्थ्यास मिळणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या माध्यमातून कायमस्वरूपी मजुरीवर अवलंबून न राहता सक्षमपणे स्वाभिमानी जीवन जगणे आणि सर्वांगीण विकास करण्यास वाव देणे गरजेचे आहे. त्यासाठी या 11 कामांपैकी वैयक्तिक लाभाचे काम देण्याच्या दृष्टीने गावातील पात्र लाभार्थ्यांनी त्यांच्याकडे जॉब कार्ड नसल्यास त्यांना जॉब कार्ड देणे, जॉब कार्ड नुतनीकरण करण्यासंदर्भाची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मंजूरी देण्यापुरती सिमीत न ठेवता त्याद्वारे वैयक्तिक लाभाची कामे मोठ्या प्रमाणावर निर्माण करण्यासाठी नरेगा अंतर्गत सन 2016-17 पासून कामांचा 11 कलमी कार्यक्रम व्यापक स्वरुपात राबविण्यात येणार आहे. यासंबंधी राज्य शासनाच्या नियोजन विभागामार्फत 4 ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि संबंधित कार्यालयांना परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. त्यानुसार नरेगा अंतर्गत यावर्षीपासून राबविण्यात येणाऱ्या कामांच्या 11 कलमी कार्यक्रमांतर्गत प्रत्येक जिल्ह्यात रोहयो कामांचे पुरक आराखडे तयार करण्यात येणार आहेत. याच्या पूर्व तयारीकरीता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली यवतमाळ जिल्हा परिषद येथे सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी आणि सर्व यंत्रणांची कार्यशाळा दि. 13 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे. 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेत सहभागी होऊन वैयक्तिक लाभाची कामे मोठ्या प्रमाणात प्रस्तावित करण्याचे आवाहन रोहयो उपजिल्हाधिकारी यांनी केले आहे.
00000


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी