प्रधानमंत्री आवास योजनेतून पात्र, गरजवंत लाभार्थी सुटू नये
-         पालकमंत्री संजय राठोड
दिग्रस येथे सरपंच व पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा
यवतमाळ, दि.27 : गरजवंतांना हक्काचे घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी यावर्षीपासून सुधारीत स्वरूपात प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतंर्गत पात्र, गरजवंत आणि खरे लाभार्थी सुटू नये, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
दिग्रस येथील चिरडे मंगल कार्यालयात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक तसेच तलाठी यांच्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विनय ठमके, जिल्हा परिषद सदस्य दिवाकर राठोड, पंचायत समिती सभापती संगिता राठोड, उपसभापती कल्पना जाधव, सदस्य अमोल मोरे, प्रमिला इंगोले, तहसिलदार किशोर बागडे, गटविकास अधिकारी राजनंदीनी भागवत, सहाय्यक गटविकास अधिकारी अमित राठोड, विस्तार अधिकारी प्रभाकर पांडे आदी उपस्थित होते.
आर्थिकदृष्ट्या कमकुवत लाभार्थ्यांना हक्काचे घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना यावर्षीपासून सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांच्या प्राधान्यक्रमांच्या याद्या बनविण्याचे काम ग्रामपंचायत स्तरावर सुरू आहे. लाभार्थ्यांची निवड करतांना पात्र लाभार्थी सुटता कामा नये. यादृष्टीने ग्रामसेवकांची महत्वाची भूमिका असल्याचे पालकमंत्री म्हणाले. सरपंच, ग्रामसेवकांसोबतच गावकऱ्यांनी सर्वसहमतीने पात्र लाभार्थ्यांची निवड ग्रामसभेद्वारे करावे, असेही पालकमंत्री यावेळी म्हणाले.
लाभार्थ्यांच्या यादीतून नाव सुटल्यानंतर त्यास परत घरकुल मिळण्यासाठी फार त्रास सहन करावा लागणार आहे. पात्र असतांनाही त्यास घरकुलास मुकावे लागण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. त्यामुळे याद्या बनवितांना काळजी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
यावेळी प्रकल्प संचालक विनय ठमके तसेच विस्तार अधिकारी प्रभाकर पांडे यांनी योजनेची सविस्तर माहिती दिली. लाभार्थी निवडतांना करावयाची कार्यवाही, कोणत्या लाभार्थ्यांची नावे प्राधान्याने घ्यावीत, कोणाचा समावेश यादीत होऊ शकत नाही, याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी बळीराजा चेतना अभियानांतर्गत पाच लाभार्थ्यांना पालकमंत्र्यांच्याहस्ते धनादेशाचेही वितरण करण्यात आले. कार्यक्रमास तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, तलाठी, ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन आमिन चौहान यांनी केले तर आभार श्री.मिरासे यांनी मानले.
०००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी