तंबाखूसह दारूमुक्तीही होणे गरजेचे
-पालकमंत्री संजय राठोड
यवतमाळ, दि. 15 : गेल्या काही दिवसांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण मुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. यामुळे कँसरचा धोका लहान वयातच होण्याचे प्रमाणही वाढले आहे. गावागावाची ही व्यवसनाधिनतेची स्थिती पाहता गावात तंबाखूमुक्तीसोबतच दारूमुक्ती होणे गरजेचे आहे, असे मत पालकमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केले. ते आज अर्जुना येथे आयोजित तंबाखूमुक्त शाळेच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.
यावेळी खासदार भावना गवळी, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, पोलिस अधिक्षक अखिलेशकुमार सिंह, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुचेता पाटेकर, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती नरेंद्र ठाकरे, पंचायत समिती उपसभापती नरेंद्र राठोड, गटशिक्षणाधिकारी वासुदेव जयधरे, सरपंच मुकुंद व्यवहारे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, पारतंत्र्याचा काळ आठवल्यास प्रत्येकाला अनेकांनी दिलेले बलिदान आठवते. त्यामुळे आज देश घडविण्यासाठी बलीदानाची नव्हे तर समाज घडविण्याची जबाबदारी आपल्यावर आली आहे. विद्यार्थ्यांवर सर्वात मोठा प्रभाव हा शिक्षकांचा असल्याने शिक्षकांच्या वर्तनात सुधारणा होणे गरजेचे आहे. कोणत्याही परिस्थितीत शिक्षक शाळेत तंबाखू खाऊन येता कामा नये. शाळांच्या जवळ सुरू असलेली तंबाखू विक्री तातडीने बंद करण्याच्या सूचना देण्यात येणार आहे. तंबाखू मुक्ती ही केवळ जनजागरूकतेने होणार नसून प्रत्येकाने ते ठरवावे लागणार आहे. ही एक प्रकारे लोकचळवळ होणे गरजेचे आहे. तंबाखू सोबतच दारूबंदीसाठी सातत्याने कारवाई होणे गरजेचे आहे. त्यासाठी गावातील नागरीकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेतला. या कामांमुळे नागरीकांचे जीवनमान उंचावणार आहे. बळीराजा चेतना अभियानातून विकासकामे घेण्यात येत असून शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. जलयुक्तच्या कामाचे चांगले परिणाम होणार असल्यामुळे येत्या काळात ही योजना प्रत्येक गावात राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.
जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी व्यवसनाधिनचे दु:ख आपण जाणत असल्याचे सांगून दारूबंदीसाठी महिलांनी पुढाकार घ्यावा, असे सांगितले. जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. सिंह यांनी तंबाखू हे व्यसन घातकच आहे. त्यामुळे बालवयातच त्यांच्या मनावर तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत सांगितल्यास पुढची पिढी ही तंबाखूपासून मुक्त झालेली असेल. तसेच शाळेजवळी तंबाखू विक्रीची दुकाने हटविण्यासाठी पोलिसांचे सहकार्य देण्यात येणार असल्याचे सांगितले.
सलाम मुंबई फाऊंडेशनचे अजय पिवळणकर यांनी प्रास्ताविक केले. चंद्रबोधी घायवाटे यांनी सूत्रसंचालन केले.
अवैध दारू विक्रेत्यांवर तात्काळ कारवाईचे निर्देश
            अर्जुना येथील तंबाखू मुक्तीच्या कार्यक्रमादरम्यान गावातील 72 नागरीकांनी 15 अवैध दारूविक्रेत्यांच्या नावानीशी तक्रार जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांच्याकडे लेखी स्वरूपात केली. याची दखल घेत जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी या 15 जणांवर रात्री बारा वाजताच्या आत प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यासोबतच शाळेत तंबाखू सेवन करून येणाऱ्या शिक्षकांची नावे विद्यार्थ्यांनी कळविल्यास संबंधित शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी कार्यक्रमातच जाहीर केले.
00000


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी