अवयवदान ही जनतेचे अभियान व्हावे
- पालकमंत्री संजय राठोड
यवतमाळ, दि. 26 : राज्य शासनाने अवयवदानाचे महत्त्व ओळखून अवयवदानाची चळवळ राज्यात उभी केली आहे. प्रचार आणि प्रसिद्धीच्या माध्यमातून नागरीकांना अवयवदानाची माहिती पोहोचविण्यात येत आहे. यासोबतच सर्वसामान्य नागरीकांचा यात सहभाग वाढावा, अवयवदानाची ही चळवळ जनतेचे अभियान व्हावे, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.
आज वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अवयवदान जनजागृती करण्याबाबत आयोजित महाअवयवदान अभियानासंदर्भात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुफाटे, आरोग्य सभापती नरेंद्र ठाकरे, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, अधिष्ठाता अशोक राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. टी. जी. धोटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगत, सुधा राठी आदी उपस्थित होते.
श्री. राठोड म्हणाले, जिल्ह्यात अवयवदानाचे चांगले नियोजन व्हावे, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. असंख्य नागरीक अवयवदानासाठी तयार असतात, परंतु त्यांच्यापर्यंत योग्य माहिती पुरविली जात नाही. त्यामुळे हे अवयवदान अभियान राबविताना गावागावात जाऊन गावातील नागरीकांचे फॉर्म भरून घ्यावे. अवयवदान हे श्रेष्ठदान आहे, ज्याप्रमाणे रक्त आणि नेत्रदानाचे महत्त्व नागरीकांना पटले आहे, त्याचप्रमाणे अवयवदानाचेही महत्त्व नागरीकांना पटवून द्यावे, अवयवदानामुळे आपण अनेकांचे जीव वाचवू शकतो ही भावना नागरीकांमध्ये निर्माण करणे आवश्यक आहे. भावी पिढीमध्ये  जागरूकता निर्माण करणे, तसेच युवकांमध्ये अवयवदानाचे महत्त्व समजावून सांगितल्यास त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळेल.
आज राज्यात सुमारे 12 हजार रूग्ण वेगवेगळ्या अवयवदानाच्या प्रतिक्षेत आहे. त्यांना हे अवयव मिळाल्यास त्यांना नवे जीवन मिळणार आहे. आज तंत्रज्ञानाच्या मदतीने अवयव प्रत्यारोपण आवश्यक आहे. त्यासोबतच अवयव प्रत्यारोपणाची सुविधा जिल्हास्तरावर निर्माण होणे आवश्यक आहे. यातील काही प्रत्यारोपण यवतमाळात होण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही श्री. राठोड यांनी सांगितले.
श्रीमती फुफाटे यांनी अवयवदान केव्हा करावे याची माहिती देऊन अवयवदानाची ग्रामीण भागात माहिती व्हावी, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले. जीवंतपणी आणि मृत्यूनंतरही अवयवदान केल्याने अनेकांना जीवनदान मिळणार असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी युवकांमध्ये उत्साह मोठ्या प्रमाणात असतो. अवयवदानात ते महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची यंत्रणा या अभियानाच्या माध्यमातून तयार करावी. अपघातामुळे मृत्यूमुखी पडण्याची संख्या जिल्ह्यात मोठी आहे. अपघातात मृत्यू पडलेल्यांच्या नातेवाईकांनी अवयवदानाचा संकल्प केल्यास त्याचा फायदा जिल्ह्यातील नागरीकांना होऊ शकेल. अवयवदानाची ही चळवळ नागरीकांपर्यंत नेण्यासाठी संपूर्ण सहकार्य देण्यात येणार असल्याचे सांगितले. श्रीमती राठी यांनी अवप्रत्यारोपणासंदर्भात माहिती देऊन नियमांची माहिती दिली. डॉ. धोटे यांनी अवयवप्रत्यारोपणाची सुविधा जिल्हास्तरावर उपलब्ध व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. डॉ. राठोड यांनी अभियानाच्या प्रचाराबाबत माहिती दिली. डॉ. टी. सी. राठोड यांनी अवयवदानाच्या चळवळीबाबत माहिती दिली.
यावेळी अवयवदान अभियानांतर्गत 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरदरम्यान आयोजित राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. डॉ. ज्योती जाधव यांनी सूत्रसंचालन केले. अधिष्ठाता डॉ. राठोड यांनी आभार मानले.
00000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी