महाअवयवदान अभियानाची आजपासून सुरुवात
* मंगळवारी वाकेथॉन, महाफेरीने शुभारंभ
* जनजागृतीसाठी कार्यशाळा, विविध स्पर्धा
* अवयवदान केलेल्यांचा होणार सन्मान
यवतमाळ, दि. 29 : अवयवदानाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी दि. 30 ऑगस्ट ते दि. 1 सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. या महाअवयवदानाची सुरुवात मंगळवारी दि. 30 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता वाकेथॉन, महाफेरीने हेाणार आहे. या अभियानात कार्यशाळा, चर्चासत्रे विविध स्पर्धा घेण्यात येणार आहे.
मंगळवारी दि. 30 ऑगस्ट रोजी वॉकेथान महाफेरीचा सकाळी 8 वाजता पोस्टल ग्राऊंड येथून पालकमंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह आदींच्या उपस्थित शुभारंभ होईल. ही महाफेरी पोस्टल ग्राऊंड, एलआयसी चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, सर्कीट हाऊस, वैद्यकीय महाविद्यालय, श्रोतगृह या मार्गाने निघणार आहे. यामध्ये साधारणत: पाच हजार नागरीक सहभागी होतील. वैद्यकीय महाविद्यालयाच्या ऑडीटोरीयममध्ये या महाफेरीचा सकाळी 9 वाजता समारोप होईल. याच ठिकाणी पावर प्रेझेंटेशनद्वारे अवयवदानासंबंधात माहिती दिली जाईल.
बुधवारी, दि.31 ऑगस्ट रोजी कार्यशाळा, चर्चासत्र, निबंधस्पर्धा आदी कार्यक्रम घेण्यात येणार आहे. कार्यशाळा, चर्चासत्र, चित्रकला, निबंध स्पर्धा वैद्यकीय महाविद्यालयातील मुख्य प्रशासकीय इमारतीतील व्याख्यान कक्षात सकाळी 10 ते 2 या वेळेत घेण्यात येतील. यामध्ये अवयवदानाचे महत्त्व आणि जनजागृती याविषयी कार्यक्रम घेण्यात येतील. या स्पर्धांसाठी विद्यार्थी, शासकीय अधिकारी कर्मचारी आणि नागरिकांना वैद्यकीय महाविद्यालयात येणे आवश्यक आहे. वरीष्ठ महाविद्यालय आणि मोठे शासकीय कार्यालय त्यांच्या महाविद्यालय, शासकीय कार्यालयात हा कार्यक्रम राबवित असतील, तेथे एक डॉक्टर आणि कर्मचारी हा अवयवदानाचे महत्त्व आणि माहिती पीपीटीद्वारे किंवा व्याख्यानाद्वारे उपस्थिताना सांगण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयातर्फे पाठविण्यात येईल. प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक संबंधित तज्‍ज्ञ ठरवतील. त्यांना दि. 1 सप्टेंबर रोजी प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात येईल.
दि. 1 सप्टेंबर रोजी अवयवदान अभियान नोंदणी शिबिर सकाळी 9 वाजता वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाह्यरुग्ण विभागामध्ये सुरु राहणार आहे. यामध्ये पोस्टर प्रदर्शनी, अवयवदानाचे महत्व आणि जनजागृती करणे तसेच अवयवदात्यांचे फॉर्म भरून घेणे, अवयवदात्यांना ऑनलाईन नोंदणीबाबत माहिती देण्यात येईल. दुपारी 2 वाजता अवयवदान नोंदणी केलेल्या अवयवदात्यांचा सन्मान, अवयवदान  केलेल्या व्यक्तींना सन्मान अवयवदान अभियानात सक्रिय सहभाग घेतलेल्या आणि सहकार्य केल्याबाबत संबंधित डॉक्टर्स व कर्मचारी व सेवाभावी, समाजसेवी संस्था इत्यादींना प्रशस्तीपत्रक देवून गौरविण्यात येणार आहे. हा कार्यक्रम वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील व्याख्यान कक्षात होणार आहे. तालुकास्तरावर देखील अशाच प्रकारचे कार्यक्रम जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी राबविणार आहेत.
०००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी