रक्तदानासोबतच अवयवदानासाठी पुढे यावे
-पालकमंत्री संजय राठोड
* उत्पादन शुल्कच्या रक्तदान महाशिबिर
        यवतमाळ, दि. 15 : रक्तदानासोबतच आता नागरीकांमध्ये नेत्रदानाबाबत जागरूकता निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या कालावधीत रक्तदानासोबतच अवयवदानासाठी नागरीकांनी पुढे येणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे येथील डीएमएम आयुर्वेद महाविद्यालयात रक्तदान महाशिबिर घेण्यात आले. या शिबिरात भारतीय सेनेच्या अतुलनीय पराक्रमाचा सन्मान म्हणून रक्तदान करण्यात आले. या रक्तदान शिबिराला पालकमंत्री संजय राठोड यांनी भेट देऊन कौतुक केले. यावेळी खासदार भावना गवळी, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, पोलिस अधिक्षक अखिलेशकुमार सिंह, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक पराग नवलकर, केदार राठी आदी उपस्थित होते.
            पालकमंत्री म्हणाले, रक्तदान शिबीरचा उपक्रम हा अतिशय कौतुकास्पद आहे. ज्यावेळी आपल्याला रक्ताची आश्यकता असते, त्याचवेळी आपल्याला रक्तदानाचे महत्त्व कळते. रक्तदान ही वारंवार केल्यानंतरही मानवी शरीरावर कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळे विशिष्ट कालावधीनंतर सातत्याने रक्तदान करावे. सिमेवरील जवानांच्या सतर्कतेमुळे आणि त्यांच्या बलिदानामुळे आज आपण शांततापूर्ण जीवन जगू शकतो. या जवानांना सन्मान म्हणून राज्य उत्पादन शुल्क आणि त्यांच्या सहयोग संस्थांनी केलेल्या प्रयत्नांमुळे साडेतीन हजार रक्त पिशव्यांचे संकलन आतापर्यंत होऊ शकले आहे. येत्या काळातही समाजाच्या विकासासाठी कार्यरत राहावे. गेल्या काही काळात अवयव दान ही संकल्पनाही समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत रूजविणे आवश्यक आहे. आज 12 हजार नोंदणीकृत रूग्ण अवयव दानाच्या प्रतिक्षेत आहेत. अवयव दान झाल्यास त्यांचे प्राण वाचू शकणार आहे. त्यामुळे आता अवयवदानासाठी पुढे यावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी सर्वात जास्त रक्ताची आवश्यकता उन्हाळ्याच्या दिवसात पडत असल्यामुळे अशा प्रकारचे शिबिर एक मे रोजी आयोजित करण्याच्या सूचना केल्या. रक्तामुळे अनेकांचे जीवन वाचण्यास मदत होत असल्यामुळे नागरीकांनी रक्तदानासाठी समोर यावे, असे आवाहन केले. जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. सिंह यांनी अपघाताच्या वेळी रक्त मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतील, त्यामुळे नागरीकांनी रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अतुलनिय कामगिरी बजावणाऱ्या वीर शहिदांना आदरांजली वाहण्यासाठी या शिबिराचे आयोजन उत्पादन शुल्क विभागातर्फे दरवर्षी करण्यात येते. शासकीय रूग्णालयात आवश्यक असणारी रक्ताची गरज भागविण्यासाठी हे शिबिर घेण्यात येते.  याशिबिरात यवतमाळ डिस्ट्रीक्ट केमिस्ट ॲन्ड ड्रगिस्ट असोशिएशन, यवतमाळ जिल्हा मद्य विक्रेता संघ, अन्न व औषध प्रशासन यांचे सहकार्य लाभले.
उत्पादन शुल्कच्यावतीने १५ आगस्ट २०१४ पासून दरवर्षी हे शिबिर घेण्यात येते. पहिल्या शिबिरात ११५ रक्त पिशव्यांचे संकलन झाले होते. त्यानंतर वणी, पुसद, यवतमाळ या ठिकाणी वेगवेगळ्या प्रसंगी घेण्यात आलेल्या शिबिरात आतापर्यंत ३ हजार ५८३ इतक्या रक्त पिशव्यांचे विक्रमी संकलन झाले आहे. विशेष म्हणजे जानेवारी २०१५ मध्ये वणी येथे घेतलेल्या एकाच शिबिरात १०९० पिशव्यांचे संकलन झाले होते. या शिबिरातही विक्रमी रक्त संकलित करण्याचा प्रयत्न जाणार आहे.

०००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी