समाधान शिबिरातील प्रकरणे तातडीने मार्गी लावा
                                                                                                      -पालकमंत्री संजय राठोड
*29 ऑगस्टपर्यंत प्रकरणांचा निपटारा करावा
*कुचराई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई
*वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा लागणार
यवतमाळ, दि. 13 : नागरीकांच्या तक्रारीचा निपटारा करण्यासाठी जिल्हाभरात मोठ्या प्रमाणावर समाधान शिबिर घेण्यात आले. मात्र ज्यांच्यावर हे प्रश्न सोडविण्यासाठी जबाबदारी टाकण्यात आली होती, त्यांनी याबाबत कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे प्रलंबित असलेल्या प्रकरणांवर तातडीने कार्यवाही करून अहवाल सादर करावा, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी दिग्रस येथे केले. आज दिग्रस येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमातीत समाधान शिबिरातील प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी पुसदचे उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी मोहन जोशी, दिग्रसचे तहसिलदार किशोर बागडे, गटविकास अधिकारी राजनंदिनी भागवत, सहायक गटविकास अधिकारी अमित राठोड आदी उपस्थित होते.
            पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, समाधान शिबिर हे नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी आयोजित करण्यात आले होते. मात्र या शिबिरात विभागप्रमुखांना आदेश देऊन या प्रकरणांचा निपटारा करण्याचे सांगितले होते. मात्र त्यांचा पाठपुरावा करूनही अनेक विभागांनी काहीही कार्यवाही केली नाही. परिणामी नागरीकांच्या समस्या आहे, तशाच आहे. या प्रकरणांचा आढावा घेण्यात येत असून येत्या 15 दिवसांत दिलेल्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही करावी, त्याचा वस्तुनिष्ठ अहवाल 29 ऑगस्टपर्यंत पालकमंत्र्यांच्या कार्यालयात सादर करावा. यात कुचराई करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्याला जबाबदार धरून त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. नागरीकांच्या प्रश्नाला प्राधान्य देऊन कारवाई करावी, समाधान शिबिरातील तक्रारी सोडवून नागरीकांना आनंद आणि समाधान मिळवून द्यावे.
            समाधान शिबिर आयोजित करताना संबंधित तक्रारदाराला दुसऱ्याच आठवड्यात त्याच्या तक्रारीवर केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करणे अपेक्षित होते. मात्र फार मोठा वेळ देऊनही केलेल्या कार्यवाहीचा तपशिल अद्यापही कळालेला नाही. प्रत्येक विभागप्रमुखांनी तक्रारींबाबत केलेली कारवाई पालकमंत्र्यांच्या कार्यालयात कळवावी, हे करीत असताना तक्रारदाराचे समाधान झाल्याचे पत्रही सोबत जोडावे. नागरीकांची निकड लक्षात घेऊन त्यांच्या तक्रारी तातडीने सोडविण्यासाठी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
यावेळी पालकमंत्र्यांनी प्रलंबित असलेल्या तक्रारींचा व्यक्तीश: आढावा घेतला. प्रलंबित असलेल्या तक्रारींवर दिलेले निर्देश आणि त्यावर करावयाची कारवाई याबाबत पुन्हा संबंधित यंत्रणेला निर्देश देण्यात आले. याच कार्यक्रमात पालकमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतून 10 लाभार्थ्यांना प्रत्येकी 20 हजार रूपयांचे धनादेश वाटप करण्यात आले. तसेच हाताने सोयाबिन पिकांमध्ये डवरणी करणाऱ्या चिरडे दाम्पत्यांचा आणि ही बाब प्रकाशात आणणारे रामदास पद्मावार यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी आधार कार्डचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या तलाठी श्रीमती शेगोकार यांचा सत्कार करण्यात आला.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी