इंटरनेटवर होणाऱ्या गुन्ह्यांचा तपास गतीने होणार
-पालकमंत्री संजय राठोड
* सायबर लॅबचे पालकमंत्र्यांच्याहस्ते उद्‌घाटन
* इंटरनेटवरील गुन्ह्यांच्या उकलासाठी होणार मदत
यवतमाळ, दि. 15 : गेल्या काही दिवसांत इंटरनेटवरील फसवणूकीसोबतच आर्थिक गुन्ह्याचे प्रमाण जिल्ह्यात वाढत आहे. या गुन्ह्याच्या उकलासाठी पुणे किंवा मुंबई येथील प्रयोगशाळांवर अवलंबून राहावे लागत होते. मात्र आता यवतमाळातच सायबर लॅब झाल्यामुळे या गुन्ह्यांचा तपास गतीने होण्यास मदत मिळणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र पोलिस दलातर्फे राज्यातील सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सायबर लॅब जिल्ह्याच्या पोलिस अधिक्षक कार्यालयात उभारण्यात आली आहे. या लॅबचे उद्घाटन पालकमंत्री श्री. राठोड यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी खासदार भावना गवळी, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, पोलिस अधिक्षक अखिलेशकुमार सिंह, अतिरिक्त पोलिस अधीक्षक काकासाहेब डोळे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, इंटरनेटमुळे जग जवळ आले असले तरी त्याच्यासोबत हे धोकेही जवळ आले आहे. या गुन्‌ह्यांवर आता अंकूश राहण्यास मदत होणार आहे. तसेच बँक खाती किंवा सोशल मिडीयावर अनूचित प्रकारांना आळा घालण्यात येईल. गेल्या काही दिवसात इंटरनेट आणि मोबाईलच्या माध्यमातून सायबर क्षेत्रातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. व्हॅाट्सअप, फेसबुक यासारख्या इतर सोशल मिडीयाचा गैरवापर वाढत आहे. यातून आर्थिक गुन्ह्यासोबत शारीरिक शोषणाचे गुन्हेही घडत आहे. अशा सर्व गुन्ह्यांचा तपास आणि नियंत्रण ठेवण्यासाठी ही लॅब उभारण्यात आली आहे. या लॅबच्या माध्यमातून अशा गुन्ह्यांवर लक्षही ठेवण्यात येणार असल्याने जिल्ह्यातील गुन्हे नियंत्रणात राहतील. आजच्या काळात समाजात वावरताना ज्याप्रमाणे सामाजिक सुरक्षा आवश्यक आहे, त्याच प्रमाणे इंटरनेटवरही नागरीकांना सुरक्षा मिळणे आवश्यक झाले आहे. यवतमाळ येथे उभारण्यात आलेली लॅब उत्कृष्ट कार्य करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी प्रास्ताविकातून सायबर लॅबची आवश्कता आणि न्यायालयात या लॅबच्या माध्यमातून देण्यात येणारे पुरावे आणि त्यामुळे वाढणारे गुन्हा सिद्धतेचे प्रमाण याबाबत माहिती दिली.
यावेळी पालकमंत्री यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संदेश वाचून दाखविला. अमृत गव्हाणकर यांनी सूत्रसंचालन केले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांनी आभार मानले.

०००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी