पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्याकडून मुधोळकर कुटुंबियांचे सांत्वन
* कुटुंबियांना 40 हजारांची मदत
यवतमाळ, दि. 26 : आर्णी तालुक्यातील शेलू शेंदूरसनी येथील मुधोळकर कुटुंबियांची आज पालकमंत्री संजय राठोड आणि जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी भेट देऊन सांत्वन केले.
शेलूशेंदुरसनी येथील काशिनाथ मुधोळकर आणि अनिल मुधोळकर या दोघा वडील आणि मुलाने शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केली होती. नापिकी आणि यावर्षीचे पिक चांगले येणार नसल्याच्या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्यांच्या कुटुंबियांची विचारपूस आणि सांत्वना करण्यासाठी पालकमंत्री संजय राठोड आणि जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी शेलू येथील त्यांच्या राहत्या घरी भेट दिली.
पालकमंत्री श्री. राठोड यांनी मुधोळकर कुटुंबियांची माहिती घेतली. तसेच त्यांच्या आर्थिक परिस्थितीबाबत माहिती घेतली. मुधोळकर कुटुंबियांनी पालकमंत्र्यांना गेल्या अनेक वर्षांपासून मालकीची असलेली 5 एकर जमिन वाहत असल्याचे सांगितले. गेल्या दोन वर्षांपासून समाधानकारक पिक आले नाही. त्यामुळे आर्थिक परिस्थिती हालाखीची झाली असल्याचे सांगितले. तसेच यावर्षीपासून 15 एकर गावातीलच नागरीकांची शेती वाहण्यासाठी घेतली होती. या शेतीमध्येही त्यांनी घरच्या शेळ्या विकून पेरणी केली होती. यावेळी त्यांनी दोनदा पेरणी करूनही समाधानकारक पिकस्थिती नसल्यानेच आत्महत्या केली असल्याचे सांगितले. मुलाला मानसिक आजार असल्याने त्याचा अकोला येथे औषधोपचार सुरू होता. त्याच्या औषधोपचारामुळे कुटुंब अडचणीत आले असल्याचे सांगितले.
प्रशासनाच्या वतीने 40 हजारांची मदत
मुधोळकर कुटुंबियातील कर्ते पुरूषांनीच आत्महत्या केल्याने प्रशासनाच्या वतीने त्यांना तातडीची मदत उपलब्ध करून दिली. आहे. मुलांच्या नावे 30 हजारांचे बाँड, पाच हजारांची अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या तवीने मदत आणि गावातीलच नागरीकांकडून पाच हजारांची रोख रक्कम पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत मुधोळकर कुटुंबियांना देण्यात आली.
प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट
मुधोळकर पिता-पुत्राच्या आत्महत्येबाबत शेलू येथे आलेल्या पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी परिचारिकांकडून मुधोळकर कुटुंबियांची माहिती घेतली. गावाच्या आरोग्याचा भार असलेल्या परिचारिकांकडून मुधोळकर कुटुंबियांना शासनाच्या जीवनदायी आरोग्य योजना आणि संलग्नीत रूग्णालयांची माहिती नसल्याचे जिल्हाधिकारी यांच्या तपासणीत आढळून आले. गावातील नागरीकांना योग्यप्रकारच्या आरोग्य सुविधा देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले.
प्राथमिक शाळेची पाहणी
जिल्हा परिषदेची इमारत 1972 मध्ये बांधण्यात आली असून तिची वाताहात झाल्याचे नागरीकांनी यावेळी पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्यासमोर मांडली. याला लगेच दाद देत पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी शाळेची पाहणी केली. शाळेच्या इमारतीसाठी सर्वोतोपरी मदत करण्यात येईल, असे पालकमंत्री यांनी सांगितले. जिल्हाधिकारी यांनी वर्गातील मुलांशी संवाद साधून मोठे होऊन चांगले कार्य करावे, असे सांगितले.
00000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी