नियाजन समितीमध्ये नाविण्यपूर्ण बाबी मांडाव्यात
-पालकमंत्री संजय राठोड
*सदस्यांनी अत्यावश्यक कामे सुचवावीत
* लोकप्रतिनिधींनी सुचविलेली कामे घेणार
*निधीसाठी लोकोपयोगी कामांचा प्राधान्यक्रम
यवतमाळ, दि. 21 : जिल्हा नियोजन समिती ही जिल्ह्याचा एकत्रित विकास आराखडा तयार करून तिची अंमलबजावणी करण्यासाठी आहे. त्यामुळे प्रत्येक सदस्यांनी आपल्या भागात अत्यावश्यक असलेल्या सुविधांची कामे सुचविण्यासोबतच नाविण्यपूर्ण बाबी समारे आणून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधावा, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. ते आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुफाटे, खासदार राजीव सातव, आमदार मनोहर नाईक, संजीवरेड्डी बोदकुरवार, राजू नजरधने, राजू तोडसाम, डॉ. अशोक उईके, संदीप बाजोरीया, विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे सदस्य डॉ. किशोर मोघे, मुख्य कार्यकारी अधिकारी दिपककुमार सिंगला, प्रकल्प अधिकारी दिपककुमार मिना, जिल्हा नियोजन अधिकारी डी. टी. राठोड आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, जिल्हा नियोजन समिती ही प्रत्येक उपविभागामध्ये आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी नियोजनाचा आराखडा तयार करून त्याची योग्यरित्या अंमलबजावणीसाठी कार्य करते. लोकप्रतिनिधींना त्यांच्या भागात विकासकामे व्हावे, असे वाटत असले तरी जिल्ह्यात ज्या भागात जनसुविधा अत्यावश्यक आहेत, त्या प्राधान्याने समोर याव्यात, सर्व लोकप्रतिनिधींनी अशा सुविधा होण्यासाठी अनुमोदन द्यावे. नागरीकांना आवश्यक असणारी सुविधा होण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी अशा कामांबाबत सतर्क राहून ही कामे चांगल्या पद्धतीची व्हावीत, यासाठी प्रयत्न करावे.
जिल्ह्यातील ज्या भागात दुषित पाण्याचा प्रश्न आहे, त्याठिकाणच्या अंगणवाडी आणि शाळांमध्ये आरओ मशिन बसविण्याबाबत सुचना करण्यात आल्या. याबाबतचा आराखडा तातडीने सादर कराव्यात, अशा सूचना देऊन श्री. पालकमंत्री म्हणाले, धडक सिंचनमधून विहिरींची कामे पूर्ण करण्यात यावी, जलयुक्तची कामे निवडताना गावाच्या आवश्यकतेप्रमाणे निवडण्यात यावी, जिल्ह्यात माती परीक्षणाचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा, त्यानुसार पिकपद्धतीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन व्हावे, अशी लोकोपयोगी कामे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून झाल्यास गावांचा विकास होण्यास मदत होईल. त्यासोबतच अरूणावती आणि बेंबळा येथील मत्सबीज केंद्रांचे काम तातडीने करून ती तातडीने हस्तांतरीत करावी, तसेच बीओटी तत्त्वावर देण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी.
वनालगत असलेल्या शेतीमध्ये वन्यप्राण्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे प्रत्येक तालुक्यातील प्रत्येकी दोन गावे निवडून याठिकाणी प्रयोगिक तत्वावर चर खोदणे, वनामध्ये प्राण्यांसाठी अन्न आणि पाण्याची सुविधा करण्याचा प्रयोग राबविण्यात यावा. तसेच जनांवरांवरील उपचारासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात व्याव्यात. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ही कामे करण्यासोबतच जनसुविधांसाठी आवश्यक असणारी कामे सदस्यांनी प्रामुख्याने सुचवावीत. कामे सुचविताना ग्रामसभांना आवश्यक असणारी कामे सुचवावीत. जिल्ह्याचा विकास करीत असतांना प्रत्येक विभागांनी प्राधान्य यादी तयार करावी, उपलब्ध असलेला निधी आणि त्यातून होणारी कामे याची सांगड घालण्यात यावी, यासाठी विभागांची स्वतंत्र बैठक घेऊन कामांची प्राथमिकता तयार करण्यावर भर देण्यात यावा, अश सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींचा आदर करावा
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्य करणारे लोकप्रतिनिधी हे तळागाळात काम करीत असतात. त्यांना नागरीकांच्या समस्यांची जाण असते. हे लोकप्रतिनिधी कामे घेऊन अधिकाऱ्यांकडे आल्यास त्यांचा आदर करावा, त्यांनी सूचविलेली कामे जिल्हा विकास आराखड्यात सादर करावीत, तसेच सार्वजनिक कामांसाठी आलेल्या लोकप्रतिनिधींना योग्य वागणूक द्यावी आणि त्यांचा आदर द्यावा, अशा सूचनाही पालकमंत्री यांनी लोकप्रतिनिधींनी केलेल्या तक्रारीवर अधिकारी वर्गाला दिल्या.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी