युवकांनी मुद्रा योजनेचा लाभ घ्यावा
-जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह
*मुद्राच्या माहितीसाठी तालुकास्तरावर मेळावे
*प्रशिक्षण घेतलेल्या तरूणांना प्राधान्य
*जिल्हा मुद्रा बँक समन्वय समितीची सभा
यवतमाळ, दि. 11 : मुद्रा योजनेतून युवकांना कर्ज पुरवठा करून त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध झाल्यास त्यांचे जीवनमान उंचाविण्यास मदत होणार आहे, त्यामुळे होतकरू आणि यशस्वी उद्योजक होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या युवकांनी मुद्रा बँक योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले. ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुद्रा बँक योजना समन्वय समितीच्या आढावा बैठकीत बोलत होते.
यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी डी. टी. राठोड, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एस. एस. मुद्दमवार, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी श्री. राठोड, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्राच्या सहायक संचालक प्रांजली बारस्कर, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रशांत देशपांडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या सहायक प्रकल्‍प संचालक सविता राऊत आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, बँकांच्या धोरणामुळे छोटे व्यवसाय करणारे, नव्याने व्यवसाय करणाऱ्यांना कर्ज मिळत नव्हते. पंतप्रधानांनी जाहिर केलेल्या मुद्रा बँक योजनेमुळे दहा हजार रूपयांपासून कर्ज मिळण्याची सुविधा कोणत्याही तारणाविना मिळण्याची व्यवस्था निर्माण झाली आहे. व्यवसायाची कोणतीही पार्श्वभूमी नसल्यामुळे अनेक युवकांना उद्योग उभारणीसाठी अनंत अडचणी येतात. अशा युवकांना कर्ज पुरविण्याबरोबर संबंधित उद्योगासाठी लागणारे प्रशिक्षणही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुद्रा बँक योजनेतून कर्ज वाटप करताना युवकांना केंद्रीत ठेऊन कर्ज वाटप करण्यात येणार आहे. या योजनेतून छोट्या उद्योगांना कर्ज मिळविण्यासाठी मध्यवर्ती बँक, सहकारी बँकांनाही उद्दिष्ट देण्यात येणार आहे.
मुद्रा योजनेतून कोणत्या व्यवसायासाठी कर्ज मिळणार आहे, कर्जाच्या हप्त्यांची परतफेड, याबाबत योग्य माहिती युवकांना मिळावी, यासाठी प्रत्येक तालुकास्तवर बरोजगार युवकांच्या मार्गदर्शनासाठी कार्यशाळा घेण्यात येणार आहे. याच माध्यमातून युवकांना त्यांच्या परिसरात असलेल्या रोजगार आणि व्यवसायाच्या संधीबाबतही तज्ज्ञ व्यक्तीतर्फे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यासोबतच युवकांना विशिष्ट व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण शासनाच्या विविध योजनांमधून देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. अशा प्रशिक्षणामुळे मुद्रासोबतच इतरही योजनांमधून युवकांना कर्ज मिळणे सुलभ होणार आहे. रोजगाराची आवश्यकता प्रामुख्याने युवकांना असल्याने या योजनेच्या सुरवातीच्या काळात युवकांना कर्ज मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
जिल्ह्यात नव्याने येणारे उद्योग आणि विकासकामांमुळेही कुशल मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. या उद्योगधंद्यांसाठीही पुरक उद्योग उभारावे लागणार आहे. यात जिल्ह्यातील युवकांचा सहभाग वाढावा, यासाठी मुद्रा बँक योजनेतून पतपुरवठा करण्यात येईल. त्यासोबतच जिल्ह्याचे एक क्लस्टर तयार करून प्रामुख्याने त्याच उद्योगासाठी अर्थसहाय्य दिल्यास अशा उद्योग उभारणीस हातभार लागेल. हे सर्व प्रयत्न होत असताना रोजगार आणि व्यवसायाच्या दर्जात सुधारणा होणे अपेक्षित असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी