चंद्रपूर जिल्ह्यालगतचे 14 दारूदुकान परवाने रद्द
*जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांची कारवाई
*राज्यातील मोठ्या कारवाईची पहिलीच घटना
*दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात विक्रीचा ठपका
*एक परवाना तीन महिन्यासाठी निलंबित
            यवतमाळ, दि. 12 : दारूबंदी झालेल्या चंद्रपूर जिल्ह्यालगत असलेल्या वणी येथील 14 दारूदुकानांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी घेतला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केलेल्या 15 परवान्यांपैकी 14 परवाने कायमस्वरूपी रद्द तर एक परवाना तीन महिन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे.
            रद्द करण्यात आलेल्या अनुज्ञप्तीधारकांमध्ये ए. एन. ठाकरे, कुंभा, ता. मारेगाव, एम. एच. नक्षिणे, मुकुटबन, ता. झरीजामणी, सी. एम. जयस्वाल, चिखलगाव, पी. जे. जयस्वाल, मार्डी, ता. मारेगाव, पी. पी. जयस्वाल, मारेगाव, एन. के. देरकर, वणी, के. पी. जयस्वाल राजूर, ता. वणी, दिपक ट्रेडर्स, भालर, ता. वणी, वरलक्ष्मी ट्रेडर्स, वणी, संजय ट्रेडर्स वणी, पार्थ वाईन शॉप, वणी, डीडीएस हॉटेल, लालगुडा, ता. वणी, गितांजली हॉटेल, माथोली, ता. वणी, सनरोज हॉटेल, साखरा, ता. वणी यांचे कायमस्वरूपी रद्द करण्यात आले, तर पी. ए. गोलापल्लीवार, मार्डी, ता. मारेगाव यांचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला आहे.
            चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केल्यापासून जिल्ह्याच्या सिमेवरील यवतमाळ जिल्ह्यातील अनुज्ञप्तीधारकांकडून नियमबाह्यरित्या आणि बेकायदेशिर दारूविक्री होत असल्याच्या तक्रारी वारंवार निदर्शनास आल्या होत्या. या अनुज्ञप्तीधारकांकडून जिल्हाधिकारी यांनी कारणे नमूद करून स्पष्टीकरण मागविले होते. याबाबत जिल्हाधिकारी यांनी वेळोवेळी सुनावणीही घेतली होती. त्यानुसार या अनुज्ञप्तीधारकांनी स्पष्टीकरण सादर केले होते. यातून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने त्यांना पुन्हा लेखी स्पष्टीकरण सादर करण्यास सांगितले होते. त्यांचे स्पष्टीकरण आणि अनुज्ञाप्तीधारकांवर चंद्रपूर आणि यवतमाळ येथील पोलिस अधीक्षक यांनी अवैध दारू प्रकरणी गुन्हे दाखल केल्याचे पुरावे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी सखोल चौकशी केली असता चंद्रपूर जिल्ह्याला लागून असलेल्या सिमाभागातील अनुज्ञप्तीधारकाने त्यांची अनुज्ञप्ती असलेल्या गावाच्या लोकसंख्येच्या सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात मद्यविक्री केली असून त्याप्रमाणे एक दिवसीय मद्यसेवन परवान्याचे वितरण केलेले नाही. यावरून हे अनुज्ञप्तीधारक हे अवैधरित्या कोरडा असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात मद्यवाहतूक करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
            या सर्व बाबींवरून जिल्हाधिकारी यांनी मुंबई दारूबंदी कायदा 1949 च्या कलम 54 (1)(सी)  नुसार 14 दुकानांच्या अनुज्ञप्त्या रद्द केल्या आहेत, तर 1 अनुज्ञप्ती 3 महिन्यांकरीता निलंबित केलेली आहे. अशाप्रकारची मोठी कारवाई राज्यात पहिल्यांदाच झाली आहे.
00000


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी