पालकसचिवांनी घेतला विकासकामांचा आढावा
*स्थानिक संस्थांच्या प्रतिनिधींना प्रशिक्षण देणार
*शिष्यवृत्तीची उपयोगिता वाढविण्यावर भर
*नरेगाच्या कामांतून विकास साधणार
यवतमाळ, दि. 19 : जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या अनुषंगाने जिल्ह्याचे पालकसचिव व्ही. गिरीराज यांनी विविध विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले आणि विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
श्री. गिरीराज म्हणाले, जिल्ह्यात रोजगार हमी योजनेतून घेण्यात येणाऱ्या कामांना मोठा वाव आहे. नरेगा अंतर्गत नव्याने 11 कामे सुचविण्यात आली आहे, तरीही केवळ रस्त्यांचीच कामे सर्वत्र घेतल्या जात आहे. इतरही कामांवर भर देणे गरजेचे आहे. जिल्ह्यातून स्थानिक संस्थांनी रस्त्यांचीच कामे सुचविली तरी त्यास मान्यता आवश्यकता तपासूनच द्यावी, वेळ पडल्यास केवळ रस्त्यांच्या कामांची मान्यता जिल्हाधिकारी यांच्याकडून देण्याचा पर्याय अवलंबवावा. जिल्ह्यातील काही भागात रोजगार हमी अंतर्गत पाणलोटाची कामे योग्यरित्या झालेली नाही, त्याठिकाणच्या यंत्रणेला योग्य मार्गदर्शन झाल्यास योजनेतून मनुष्य दिवस वाढण्यास मदत होणार आहे.
राज्यात काही ठिकाणी ग्रामपंचायतींनी फलोत्पादनाचा अभिनव उपक्रम राबविला आहे. वर्धा जिल्ह्यात तीन हजार एकरवर फळबाग ग्रामपंचायतीने निर्माण केली आहे. अशा प्रकारचे उपक्रम जिल्ह्यातही होणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हास्तरीय यंत्रणांनी कार्य करणे गरजेचे आहे. यासोबतच जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50 टक्के महिला निवडून आल्या आहेत. त्यांना राजकारण आणि शासनाच्या कामकाज तसेच योजनांची माहिती नाही. त्यांचा आत्मविश्वास उंचाविण्यासाठी त्यांना चांगल्या दर्जाचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्यासाठी पोलारीस ही संस्था वर्धा येथे लोकप्रतिनिधींना प्रशिक्षण देण्यासाठी पुढाकार घेत आहे. सुरवातीला केळापूर, राळेगाव, कळंब, वणी, मारेगाव, झरीजामणी या तालुक्यातील सदस्यांना प्रशिक्षणाला पाठवून प्रशिक्षणाच्या फायद्याची माहिती घेण्यात येईल. त्यानंतर जिल्ह्यातील इतर सदस्यांना प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येईल. सामाजिक न्याय विभागामार्फत शैक्षणिकस्तरावर विविध शिष्यवृत्ती दिल्या जाते. या शिष्यवृत्तीची उपयोगीता वाढविण्याबाबत करावयाच्या उपाययोजनांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी