जिल्हाधिकारी कार्यालयात रानभाज्यांची मेजवानी
यवतमाळ, दि. 10 : रानभाज्यांची लज्जत काही औरच. जिल्ह्यात सर्वदूर पसरलेले वन आणि त्यामध्ये पावसाच्या आगमनानंतर येणारी रानभाजी अनेकांच्या आवडीची असते. मात्र ही भाजी बाजारात येताच हातोहात विकली जाते. तसेच ग्राहकांची मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्याने दरही चढे असतात. नागरीकांना थेट शेतकऱ्यांकडून भाजीपाला मिळावा, यासाठी बळीराजा चेतना अभियानाच्या माध्यमातून बाजार भरविण्यात येतात. या बाजारात शुक्रवारी नागरीकांना वाजवी दरात रानभाज्या विकत घेण्याची संधी मिळणार आहे.
जिल्ह्यामध्ये बळीराजा चेतना अभियानाचा एक भाग म्‍हणून जिल्हाधिकारी कार्यालयातील परिसरात दर शुकवारी शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहचविण्याची संधी बाजाराच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिली आहे. जिल्ह्यात राबविलेल्या या बाजार उपक्रमाची  नोंद वरिष्ठ स्तरावर घेण्यात आली आहे. सद्याच्या पावसाळी वातावरणात विविध प्रकारच्या रानभाज्या उपलब्ध होतात. त्यांचे औषधी उपयोग देखील अनेकांना ज्ञात आहे. या अनुषंगाने रानभाज्या विक्रीचा कार्यक्रम दर शुकवारी बळीराजा थेट शेतमाल विक्री बाजारामध्ये आयोजित करण्यात आला आहे.
या बाजारात यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शेतकरी रानभाज्या विक्रीसाठी आणू शकतात. अशा शेतकऱ्यांनी आपल्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयातील तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) यांच्याकडे नोंद तसेच संपर्क करून दर शुकवारी त्यांच्याकडील उपलब्ध असलेल्या रानभाज्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात भरविण्यात येणाऱ्या थेट शेतमाल विक्री बाजारामध्ये आणाव्यात, असे आवाहन प्रकल्प संचालक, आत्मा यांनी केले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी