शेतकऱ्यांनी पारंपरीक पिकांसोबतच अन्य पिकेही घ्यावीत
-जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह
* बचत भवन येथे शेतकरी दिन साजरा
*प्रयोगशील शेतकऱ्यांचा सत्कार
यवतमाळ, दि.16 : जिल्ह्यात अनेक शेतकरी विविध नाविण्यपूर्ण प्रयोग करीत आहे. यात त्यांना चांगले यशही येत आहे. अन्य शेतकऱ्यांनी या प्रयोगाचे अनुकरण करत पारंपरीक पिकांसोबतच फळपिके तसेच जोडधंदा करणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.
बचत भवन येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या स्मरणार्थ शेतकरी दिनाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. कार्यक्रमास लक्ष्मण राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, आत्माचे प्रकल्प संचालक अनिल इंगळे, कृषि विकास अधिकारी जगन राठोड, कृषि विज्ञान केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक श्री. पाटील, उपविभागीय कृषि अधिकारी डॉ. नाईक, तालुका कृषि अधिकारी श्री. भवरे आदी उपस्थित होते.
कृषि दिनाचे औचित्य साधत जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पारंपरीक पिकांसोबतच विविध पिकांचे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या शेतकऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यात कारेगाव, ता. यवतमाळ येथील राजकुमार काटेखाये, यवतमाळ येथील मधुकर डेहणकर, तळेगाव, ता. यवतमाळ येथील शाबीक कोठडीया, डोर्ली, ता. यवतमाळ येथील श्रीरंग घोडवे, वाकी रोड, यवतमाळ येथील सुरेश कटामले यांचा समावेश आहे. या शेतकऱ्यांचे कौतुक करत इतर शेतकऱ्यांनीही या शेतकऱ्यांसारखी पिकपद्धती अवलंबण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.
एकाच पिकांचा अवलंब केल्यामुळे सदर पिकाने दगा दिल्यास शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागते.  नुकसानीचे हे प्रमाण कमी करण्यासाठी काही क्षेत्रावर अन्य पिकेही घेणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी फळपिके, मसाला पिके, कुकुटपालन, दुग्धव्यवसाय यासोबत इतर जोड व्यवसायाचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
यावेळी पुरस्काप्राप्त काही शेतकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पुरवठा निरीक्षक एकनाथ बिजवे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास प्रगतीशील शेतकरी उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी